न.प. मुख्याधिकाऱ्यांना पाठींबा व मागणी – गावातील अतिक्रमण हटवा , गल्ली बोळातील रस्ते मोठे करा
नगर परिषद सिंदखेड राजा मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांनी अतिक्रमण हटाव मोहिम हाती घेतली आणि नागरिकांमधून त्यांना जोरदार पाठींबा व समर्थन मिळत आहे. अशाच प्रकारे गावातील, गल्ली बोळातील, नाल्यावरील अतिक्रमण हटवून रस्ते मोकळे करून द्यावे, मोठे करून द्यावे अशी मागणी देखील नागरिक आता करत आहेत. सिंदखेड राजाचे सिंघम म्हणून त्यांची ख्याती होईल असे काम ते येत्या काळात करतील अशी गावातील कट्यावर चर्चा सुरु झाली आहे.
नालीवर बांधलेल्या भिंती, समोर आलेले ओटे, अनेकांच्या पायऱ्या रस्त्यात आल्याने संपूर्ण गावकरी त्रस्त आहेत पण बोलायला कुणी तयार नव्हत. आता मात्र कार्यवाही सुरु झाल्यानंतर नागरिक समाधानाची भावना व्यक्त करत आहेत आणि आमची गल्ली देखील सुधारून द्या अशी मागणी करताना दिसत आहेत.
ठाकरे मेडिकल पासून बाजार गल्लीपर्यंत जाणारा रस्ता, राजवाड्यापासून नाव्ही गल्ली-माणिक चौक-शिवणी टाका रस्ता, कालाकोट पासून रामेश्वर मंदिरा पर्यंत जाणारा रस्ता, आढाव गल्ली-मुंबई पुणे डाक लाईन रस्ता आणि राजवाड्यापासून त्रीगोनी गल्ली पर्यंतचा रस्ता, जुन्या पोस्ट ऑफिस पासून बालाजी गल्लीकडे जाणारा रस्ता, राजवाड्याच्या डाव्या बाजूने कुहीरे गल्लीपासून माणिक चौकाकडे जाणारा रस्ता, हे गावातील मुख्य रस्ते आहेत मात्र या रस्त्यांना अतिक्रमणाने घेरलेल आहे, रस्ते अरुंद झाले आहेत त्यामुळे अनेक गाड्यांचे अपघात होत आहे. दोन वाहने रस्त्याने जाऊ शकत नाही अशी अवस्था आहे. त्यामुळे या रस्त्यांना प्राधान्याने मोकळ कराव आणि गल्ली बोलतील रस्ते देखील मोठे करावे अशी गावकऱ्यांची मागणी आहे.
चौकाचौकातील धार्मिक स्थळे वाढत चाललेली आहे. मत मिळविण्यासाठी राजकीय मंडळी अशा अतिक्रमण असलेल्या जागेंना निधी देऊन रस्त्यात सभा मंडप आणि धार्मिक स्थळे उभारत आहेत याला सुद्धा काही नागरिकांचा विरोध आहे मात्र आपण बोलून डोळ्यावर का यायचं या विचाराने सगळे गप्प होते. मात्र मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांनी कार्यवाही सुरु केल्यानंतर आता नागरिक बोलू लागले आहेत आणि आपल्या समस्या उघडपणे मांडू लागले आहेत. आणि मुख्याधिकारी यांच्या कामाला पूर्ण समर्थन देत आहेत. त्यांनी कार्यकाळ संपण्यापूर्वी सिंदखेड राजाचा कायापालट करावा अशी अपेक्षा त्यांच्याकडून आहे.